पाटणा - बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणत पुन्हा एकदा आरजेडीला सत्तेत आणल्यानंतर तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. सुशील कुमार मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले की, केंद्र सरकारने आपल्या इशाऱ्यावर सीबीआयला सातत्याने आमच्याविरोधात वापरले आहे. मात्र आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही. तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, सीबीआयने आमच्या घरातच कार्यालय उघडावे, त्यासाठी मी जागा देऊ.
बिहारचे नवे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आयआरसीटीसी टेंडर घोटाळा प्रकरणात जामिनावर आहेत. या प्रकरणी तेजस्वी यादवची आई आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी करण्यात आली होती. सुशील कुमार मोदी यांनी याच विषयाकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की, नितीशजी तुमचे उपमुख्यमंत्री जामिनावर आहेत. त्याच आरोपांना तेजस्वी यादव यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिले आहे.
भाजपा नेते नित्यानंद राज यांनी केलेल्या आरोपांनाही तेजस्वी यादव यांनी उत्तर दिलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार आणि माझ्या जोडीला जे लोक साप आणि मुंगुसाची जोडी म्हणत आहेत, त्यांच्या छातीवर साप बसला आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांकडून देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आलेली नसल्याने भाजपाचे नेते संतप्त आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाला संपवण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांना देण्यात आली होती. मात्र होमवर्क पूर्ण न झाल्याने आता भाजपा सैरभैर झाली आहे.
बिहारमध्ये लोकांना रोजगार देण्याच्या आणि विकासकामांसाठी केलेल्या आश्वासनांबाबत तेजस्वी यादव यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, मी पहिल्यांदा विधानसभेत जाताच उपमुख्यमंत्री बनलो होतो. अनेक विभागाचा कार्यभार सांभाळला होता. अनेक विकासकामे केली. खूप कमी दिवसांत मंत्री, विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्ष असा अनेक गोष्टींचा अनुभव घेतला. कमी अनुभव असताना अनेक कामं केली होती. आता पहिल्यापेक्षा जास्त आणि प्रत्येक प्रकारचा अनुभव मिळाला आहे. त्यामुळे आता वेगाने विकास करता येईल.