- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आपले वडील लालूप्रसाद यादव यांच्या पावलावर पाऊल ठेवून बिहारची सूत्रे पत्नीच्या हाती सोपवू शकतात का, हाच प्रश्न सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. रेल्वे घोटाळा प्रकरणात जेलमध्ये जाण्याची शक्यता पाहता, तेजस्वी यादव हे आपली पत्नी राजश्री यादव यांच्याकडे बिहारचे उपमुख्यमंत्रिपद सोपवू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांनी चारा घोटाळ्यात जेलमध्ये जाण्याच्या कालावधीत पत्नी राबडीदेवी यांना या पदावर बसविले होते. सध्या तेजस्वी यादव हेही राजकारणावरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी राजश्री यादव यांना हे पद देऊ शकतात. यामुळे राजश्री यादव याही राबडीदेवींप्रमाणेच बिहारच्या सत्तेवर वर्चस्व निर्माण करतील व लालू कुटुंबीयांकडेच सत्ता राहील.
तेजस्वी यादव संकटात अडकत असताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मनातून आनंद झालेला दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी राजदकडून सध्या तरी दबाव निर्माण केला जाणार नाही. यापूर्वी राजद नेते दररोज तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव आणत होते.