हरीश गुप्ता
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे तेजस्वी हे चिरंजीव आहेत.या निवडणुकीत राज्याचे प्रभारी असलेले व सध्या पाटण्यात प्रचार करीत असलेले अविनाश पांडे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी ‘लोकमत’ला आम्ही लवकरच नेतृत्वाचा प्रश्न सोडवू,’ असे सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) बाहेर पडावे यासाठी काँग्रेसने चिराग पासवान यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यांनी थंड प्रतिसाद दिल्यानंतर पर्याय नसल्यामुळे काँग्रेसने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्याचे ठरवले. डाव्या पक्षांनीही याला मान्यता दिली. लोकतांत्रिक जनता दलाने पक्षाचे प्रमुख नेते शरद यादव हे राज्यात विरोधी पक्षांची आघाडी सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करतील, असे रविवारी म्हटले. यादव हे नितीश कुमार यांच्याशी हात मिळवणी करणार अशा चर्चा सुरू झाल्याहोत्या.243 जागांपैकी काँग्रेसला ७३-७५ तर डाव्या पक्षांना ३० जागा हव्या आहेत. म्हणजे राजदच्या वाट्याला साधारण १४० जागा येतील.2015 मध्ये विधानसभा निवडणूक काँग्रेस-राजद-जनता दल (संयुक्त) यांनी एकत्रितपणे जागा लढवून ४३ टक्के मते मिळवली व २४३ पैकी १७८ जागा जिंकल्या होत्या.101 जागा प्रत्येकी दोन्ही पक्षांनी लढवूनही राजदने ८० व जनता दलाने (संयुक्त) ७१ जागा जिंकल्या. राजदला १९ तर नितीशकुमार यांना १६.८ टक्के मते मिळाली होती. ६.७ टक्के मते मिळवून काँग्रेसने २७ जागा जिंकल्या होत्या.