पाटणादिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी शेतकरी आंदोलनांना पाठिंबा जाहीर केला आहे. यात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये आंदोलन पुकारल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'एफआयआर' दाखल होताच तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा", असं थेट आव्हान तेजस्वी यादव यांनी दिलं आहे.
दिल्लीच्या सिंघू सीमेवर गेल्या १० दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना आता संपूर्ण देशातून पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची सरकारसोबत सुरू असलेली चर्चा देखील वारंवार निष्फळ ठरत आहेत. नवे कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनीही आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनाची परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरल्याने तेजस्वी यादव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. "शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल डरपोक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आमच्याविरोधात एफआयआर दाखल केली. तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करा. मी वाट पाहिन. नाही केली तर मी स्वत:हून अटकेला सामोरा जाईन. शेतकऱ्यांसाठी एक एफआयआर काय फाशीदेखील द्यायची असेल तर तीही द्या", असा जोरदार हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला आहे.