नवी दिल्ली - तेलंगणासरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्क्यांची घसघशीत पगारवाढ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तेलंगणातील तब्बल 9 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. फक्त पगारवाढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे आता 58 वरुन 61 करण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. निवृत्त आयएएस अधिकारी सी. आर. बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या 11th Pay Revision Commissionच्या सूचनांवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. यापूर्वी तेलंगणा सरकारने 2014 मध्ये Pay Revisionची घोषणा केली होती. 2014 मध्ये तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन 43 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पगारवाढीची मागणी ही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत होती. बिस्वाल आयोगाने वेतन वाढीची शिफारस ही सरकारकडे केली होती. कोरोना महामारीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य सरकारचीही आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या निर्णयाला वेळ लागला. आता परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. तसेच ही पगारवाढ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युटीची रक्कम देखील 12 लाखांवरून 16 लाख करण्यात आली आहे.
2018 मध्ये तेलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पक्ष हा निवृत्तीच्या वयात बदल करणार आणि त्याचा फायदा हा लाखो कर्मचाऱ्यांना होणार अशी घोषणा केली होती. तेलंगणामध्ये 9.17 लाख सरकारी कर्मचारी आहे. ज्यांना आता 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे. आतापर्यंत पगारवाढ ही फक्त सामान्य कर्मचाऱ्यांना मिळायची. पण आता कॉन्ट्रॅक्ट आणि आऊटसोर्सिंगवर काम करणाऱे कर्मचाऱी, होमगार्ड्स, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्यांना देखील याचा फायदा मिळणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.