तेलंगणाच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून जवळपास १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचे (TSRERA)सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण यांच्या निवासस्थानासह विविध ठिकणी छापेमारी केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १४ पथकांनी काल दिवसभर तपास सुरू केला. त्यानंतर आजही पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू करण्यात येणार आहे. एस. बालकृष्ण यांच्या निवास्थानावर, कार्यालयांवर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान १०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली.
आतापर्यंत जवळपास ४० लाख रुपये रोख, २ किलो सोने, स्थिर-स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, ६० महागडी घड्याळे, १४ मोबाईल फोन आणि १० लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, एस. बालकृष्ण यांचे बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी किमान चार बँकांमधील लॉकर्स ओळखले आहेत.
याचबरोबर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना एस. बालकृष्ण यांच्या निवासस्थानी कॅश मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर एस. बालकृष्ण यांनी कथितरित्या मालमत्ता मिळवली होती. दरम्यान, तपासात आणखी मालमत्ता उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, एस. बालकृष्ण यांनी यापूर्वी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून काम केले आहे.