Telangana Assembly Election 2023: आज चार राज्यांचे निकाल हाती आले. यात काँग्रेसला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर, तेलंगणात पक्षाचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसने मुख्यमंत्री केसीआर यांची दहा वर्षांची सत्ता उलथून लावली. विजयाची हॅटट्रिक मारण्याचे बीआरएसचे स्वप्न काँग्रेसमुळे पूर्ण होऊ शकले नाही.
विशेष म्हणजे, तेलंगणा निवडणुकीत भाजपनेही 8 जागा जिंकत मोठी झेप घेतली. यात कामरेड्डी मतदारसंघ हॉटसीट होता. मुख्यमंत्री KCR आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी, या जागेवरुन रिंगणात होते. मात्र, या दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चारत भाजप उमेदवार कटिपल्ली व्यंकट रमण रेड्डींनी मोठा विजय मिळवला. 53 वर्षीय कटिपल्ली रेड्डी दोन्ही बड्या नेत्यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.
काँग्रेसच्या विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनाच जाते. संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही ते आघाडीवर आहेत. रेवंत यांनी कामारेड्डी आणि कोडंगल, अशा दोन जागांवरुन निवडणूक लढवली होती. सीएम केसीआर यांनीही गजवेल आणि कामारेड्डी, या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, या दोघांचाही कामारेड्डी जागेवर पराभव झाला. कामारेड्डी येथील कट्टीपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी दोन्ही हेवीवेट उमेदवारांचा पराभव केला. पण, रेवंत रेड्डी कोडंगलमधून आणि केसीआर गजवेलमधून विजयी झाले आहेत.
कटिपल्ली वेंकट रमन रेड्डी यांच्या विजयाला भाजपचे सर्व नेते महत्त्व देत आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून कटिपल्ली यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करून लिहिले, या महानायकाकडे दुर्लक्ष करू नका! भाजपच्या कट्टीपल्ली वेंकट यांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातून तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी यांचा पराभव केला आहे. हा एक मोठा विजय आहे.