भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा काँग्रेसचे माजी खासदार मोहम्मद अझरुद्दीन यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत राष्ट्र समितीवर (BRS) जबरदस्त हल्ला चढवला आहे. याच बरोबर त्यांनी काँग्रेस विजयाचा दावाही केला आहे. यावेळी काँग्रेसने त्यांना ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
माध्यमांसोबत बोलताना मोहम्मद अजहरुद्दीन म्हणाले, तेलंगणातील लोकांना परिवर्तन हवे आहे. के. चंद्रशेखर राव सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी फार विशेष काहीही केलेले नाही. विशेषतः अल्पसंख्यक लोकांसाठी. मागास समाजाच्या विकासातही हे सरकार फार मागे पडले आहे. यामुळे, यावेळी बीआरएस सत्तेबाहेर जाईल आणि लोक काँग्रेसला संधी देतील.
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी अझहरुद्दीन काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले आहेत. त्यांनी 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून आपल्या राजकिय कारकिर्दिला सुरुवात केली होती. तेव्हा ते विजयीही झाले होते. मात्र, 2014 मध्ये राजस्थानातील टोंक-सवाई माधोपूर लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने, तेलंगणा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत जुबली हिल्स विधानसभा सीटसाठी त्यांचे नाव निश्चित केले आहे.तिकीट मिळाल्यानंतर काय म्हणाले होते -तिकीट मिळाल्यानंतर अझहरुद्दीन म्हणाले, “मला माझ्या राज्यातून तिकीट मिळाल्याचा अत्यंत आनंद आहे. मी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांचे आभार मानतो. इंशा अल्लाह आम्ही संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू आणि निवडणूक जिंकू.”