तेलंगणात काँग्रेसच सत्तेत येईल, प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Published: December 2, 2023 07:09 AM2023-12-02T07:09:06+5:302023-12-02T07:09:54+5:30
telangana Assembly Election: पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.
- कमलेश वानखेडे
नागपूर - तेलंगणात काँग्रेसला गळती लागली होती. मात्र, पक्षाचा राज्य प्रभारी म्हणून चार्ज घेतल्यानंतर गेले ११ महिने काँग्रेस एकसंघ करण्याचे काम केले. फक्त पाच आमदारांपुरती उरलेली काँग्रेस आता तेलंगणात सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसचे ७० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.
एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बातचीत केली.
‘भारत जोडो’मुळे वातावरण निर्मिती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे वातावरण निर्मिती झाली. या यात्रेनंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेवटच्या टप्प्यात भाजपसह बऱ्याच पक्षातील लोक काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचेही गेलेले बरेच परत आले.