२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 02:14 PM2023-11-27T14:14:51+5:302023-11-27T14:17:02+5:30

२६/११ चा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

telangana assembly election pm narendra modi remembers 26 /11 mumbai attack target on congress and brs kcr | २६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

२६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

तेलंगणात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्ष मोठमोठ्या सभा घेऊन प्रचार करत आहेत. भाजपने सुद्धा तेलंगणात प्रचाराचा जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदींनी मेडक जिल्ह्यातील तुपरान येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा उल्लेख करून काँग्रेसवर निशाणा साधला. हा हल्ला कमकुवत आणि असमर्थ सरकार देशाचे किती नुकसान करू शकते, याची आठवण करून देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२६/११ च्या दिवशी देश एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरला, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. जनतेला संबोधित करताना त्यांनी मुंबई हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी २६ नोव्हेंबर हा दिवस कधीही विसरता येणार नाही, या दिवशी देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

२०१४ मध्ये जनतेने देशातून काँग्रेसचे सरकार हटवले आणि भाजपचे मजबूत सरकार स्थापन केले. यामुळेच आता परिस्थिती बदलली आहे. आज देशातून दहशतवाद संपवला जात आहे. दहशतवाद्यांचा शोधून खात्मा केला जात आहे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले. विशेष म्हणजे काल नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात सुद्धा २६/११च्या हल्ल्याचा उल्लेख केला होता. 

याचबरोबर नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील आपल्या भाषणात बीआरएस प्रमुख केसीआर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. केसीआर यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, त्यांनी ना तरुणांना रोजगार दिला, ना मुलांसाठी कोणतेही काम केले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, तेलंगणातील जनतेला कधीही न भेटणाऱ्या अशा मुख्यमंत्र्याची राज्यात गरज आहे का, असा सवाल सुद्धा नरेंद्र मोदींनी उपस्थित जनतेला केला.

३० नोव्हेंबरला होणार मतदान
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ११९ जागांच्या या विधानसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने काँग्रेस, बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम रिंगणात उतरले आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल ३ डिसेंबरलाच जाहीर केला जाणार आहे. अशा स्थितीत राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

Web Title: telangana assembly election pm narendra modi remembers 26 /11 mumbai attack target on congress and brs kcr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.