हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 05:39 PM2018-11-21T17:39:37+5:302018-11-21T17:44:58+5:30
उमेदवारी जाहीर होताच स्टुडियोत नेत्यांची गर्दी
हैदराबाद: निवडणूक जिंकण्यासाठी नेते मंडळी पूर्ण ताकद पणाला लावतात. निवडणूक अर्ज भरताना, प्रचार सुरू करताना मुहूर्त पाहणाऱ्या नेत्यांची संख्याही कमी नाही. तेलंगणादेखील अशा नेत्यांना अपवाद नाही. इथले अनेक नेते निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणारे फोटो एका स्टुडियोमध्ये काढतात. या स्टुडियोमध्ये फोटो काढल्यावर विजय नक्की असतो, असं अनेक नेते मानतात.
तेलंगणातील बरकतपुरामध्ये अरुणा स्टुडियोमध्ये सध्या उमेदवारांची मोठी गर्दी आहे. अरुणा स्टुडियोमध्ये फोटो काढल्यावर निवडणुकीतील विजय पक्का होतो, असा विश्वास उमेदवारांना आहे. मुशरदबाद मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यावर अनिल कुमार यादव लगेच अरुणा स्टुडियोत पोहोचले. नामांकन अर्ज, बॅनर आणि प्रचार वाहनांवर लावायचे सर्व फोटो आपण याच स्टुडियोत काढल्याची माहिती यादव यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.
अनिल यांचे वडील आणि जीएसएमसी काँग्रेस अध्यक्ष अंजन कुमार यादव यांनी 2004 आणि 2009 मध्ये सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी याच स्टुडियोमध्ये फोटो काढले होते. या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. 'आता मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन प्रचारासाठी आवश्यक फोटो अरुणा स्टुडियोमध्ये काढले आहेत', असं अनिल यांनी सांगितलं. अनिल कुमार यादव यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाच्या इतर उमेदवारांनीही तिकीट मिळताच अरुणा स्टुडियोत फोटोसेशन केलं. यामध्ये पोनम प्रभाकर (करीमनगर), चाडा व्यंकट रेड्डी (हुसनाबाद), पी. शंकर राव (शदनगर), के लक्ष्मण (मुशीराबाद), रामरेड्डी दामोदर रेड्डी (सूर्यपेट) आणि जी. सुनीता (एलर) यांचा समावेश आहे.