तेलंगाणामध्ये सत्ताधारी बीआरएसला पराभवाचा धक्का देत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. एकीकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये दारुण पराभव झाला असताना दक्षिण भारतातील या महत्त्वाच्या राज्यामध्ये विजय झाल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र आता तेलंगाणाचं मुख्यमंत्रिपद कुणाकडे सोपवावं या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये रेवंत रेड्डी यांचं नाव आघाडीवर आहे. तेलंगाणामध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचं श्रेय त्यांनाच दिलं जात आहे. मात्र आधी भाजयुमो आणि बीआरएसमध्ये असलेल्या रेवंत रेड्डी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात अनेक अडथळे आहे. काही काँग्रेस आमदार त्यांच्या नावाला विरोध करत असल्याची माहितीही समोर येत आहे.
मात्र सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे. एका सूत्राने सांगितले की, आम्ही पर्यवेक्षकांकडून सोपवण्यात येणाऱ्या रिपोर्टच्या आधारावर निर्णय घेणार आहोत. मात्र रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदासाठी स्पष्टपणे आघाडीवर आहेत. रेवंत रेड्डी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यातील एका मतदारसंघात त्यांचा विजय झाला. तर एका मतदारसंघात त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे निवडणूक पर्यवेक्षकांचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्याशी बोलून मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
तर तेलंगाणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांच्यासोबतच काँग्रेसमधील अन्य दोन वरिष्ठ नेतेही शर्यतीत आहेत. त्यांच्यामध्ये मल्लू भट्टी विक्रमार्क यांच्या नावाचाही समावेश आहे. विक्रमार्क हे दलित नेते आहेत. तसेच ते काँग्रेसचा राज्यातील प्रमुख चेहराही आहेत. निवडणुकीदरम्यान, विक्रमार्क यांनी राज्यात १४०० किमी पदयात्रा काढली होती. त्यामधून त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता. ही पदयात्राही काँग्रेसच्या तेलंगाणामधील विजयात निर्णायक ठरली होती.
काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेलं आणखी एक नाव म्हणजे उत्तम कुमार रेड्डी. उत्तम कुमार रेड्डी हे सात वेळा निवडून आलेले आहेत. भारतीय हवाई दलातील माजी पायलट असलेल्या उत्तम कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. तेलंगाणामधील विधानसभेच्या ११९ पैकी ६४ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर मागच्या निवडणुकीत ८८ जागा जिंकणाऱ्या बीआरएसला केवळ ३९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.