७०० वाहनांचा ताफा अन् मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन; मात्र तेलंगणातच मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 12:57 PM2023-12-03T12:57:50+5:302023-12-03T13:46:26+5:30
Telangana Assembly Election Result: तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबतच तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकालही आज येत आहेत. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवर आहे. दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या आलेल्या आकडीवारीनूसार, ६७ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे. तर बीआरएस ३४ जांगावर आघाडीवर आहे. भाजपा १३ जागांवर तर एमआयएम ४ जागांवर सध्या आघाडीवर आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
तेलंगणाची स्थापना २०१३मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. केसीआर यांच्या पराभवामागे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर केसीआर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबद्दल बोलले होते. २०२४च्या निवडणुकीपूर्वीही ते याच फॉर्म्युल्याखाली विरोधी आघाडी भारतामध्ये सामील झाले नाहीत. ऑक्टोबर २०२२मध्ये, KCR यांनी राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती) केले.
इतकेच नाही तर तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक होतं. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपा राज्यात केसीआरच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात व्यस्त असताना केसीआर ७००-७०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगणासोडून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. यामध्ये संपूर्ण तेलंगणाचं मंत्रिमंडळही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल आणि तेलंगणासोडून इतर राज्यात घालवलेला वेळ केसीआर यांना महागात पडल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे.
राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यावेळी २२९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती.