हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये टीआरएससमोर पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसनं ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी तेलंगणा काँग्रेसनं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली आहे. निकालांचे कल पाहता तेलंगणातील काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रेड्डी म्हणालेत की, 'निवडणुकीच्या निकालावर मला शंका आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचाही आरोप उत्तम कुमार रेड्डी यांनी केला आहे. व्हीव्हीपॅट स्लिपचीदेखील पुन्हा मोजणी व्हावी.' ईव्हीएमबाबत संशय असल्यानं सर्व काँग्रेस नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही रेड्डी यांनी यावेळी सांगितले.
(Telangana Assembly Election Results Live : के.चंद्रशेखर राव यांचा 50,000 मतांनी विजय)
दरम्यान, काँग्रेसनं केलेले आरोप टीआरएसच्या खासदार के.कविता यांनी खोडून काढले आहेत.
टीआरएसच्या खासदार के कविता यांची काँग्रेसच्या आरोपावर प्रतिक्रिया
'निवडणुकीतील प्रत्येक पराभूत पक्ष पराभवाचे खापर ईव्हीएमवरच फोडतो. ही बाब पूर्णतः चुकीची आहे. जनतेनं टीआरएसला विजय मिळवून दिला आहे. काँग्रेस ईव्हीएमबाबत करत असलेला दावा चुकीचा आहे'.