हैदराबादः आपल्या वादग्रस्त, प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखले जाणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत त्यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवैसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. त्यामुळे एमआयएमच्या कामगिरीबद्दल उत्सुकता होती.
तेलंगणा विधानसभेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे टीआरएसनं मुसंडी मारली आहे. ११९ पैकी ८० जागांवर केसीआर यांचे शिलेदार आघाडीवर आहेत, तर काँग्रेस आघाडीनं ३० जागांपर्यंत मजल मारली आहे.
दुसरीकडे, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसला अच्छे दिन येताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये तर भाजपाकडून सत्ता खेचून घेण्यात काँग्रेसला यश आल्याचं दिसतंय. तसंच, राजस्थानमध्येही 'वसुंधरा तेरी खैर नही', हा इशारा मतदारांनी खरं करून दाखवलंय.