शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:41 AM2023-11-28T06:41:31+5:302023-11-28T06:45:07+5:30
Telangana Assembly Election:निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे.
नवी दिल्ली - निवडणूक आयाेगाने तेलंगणामध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला झटका दिला आहे. ‘रायथू बंधू’ याेजनेंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक साहाय्यता निधीचा हप्ता वितरित करण्यास दिलेली परवानगी आयाेगाने मागे घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून या याेजनेचा प्रचारात उल्लेख हाेत असून, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे आयाेगाने म्हटले आहे. आचारसंहिता लागू असेपर्यंत याेजनेंतर्गत काेणताही हप्ता जारी करण्यात येऊ नये, असे आयाेगाने आदेशात स्पष्ट केले आहे.
राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी एका प्रचारसभेत याबाबत जाहीर घाेषणा केली हाेती. तसेच पक्षाच्या इतर नेत्यांनीही प्रचारात पैसे खात्यात जमा हाेणार असल्याचा उल्लेख केला हाेता.
आयाेगाने परवानगी देताना प्रचारात हा उल्लेख न करण्याचे स्पष्ट केले हाेते. यासंदर्भात काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली होती.
शेतकरी कदापि माफ करणार नाही : काॅंग्रेस
बीआरएसचा बेजबाबदारपणा आणि संकुचित दृष्टिकाेनामुळे आयाेगाने निर्णय घेतला. बीआरएसने हे आणखी एक पाप केले असून, त्यांना शेतकरी कदापि माफ करणार नाहीत. हा पैसा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे, असे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांनी सांगितले.
हे तर घाणेरडे राजकारण : कविता
परवानगी मागे घेण्यामागे काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचे घाणेरडे राजकारण जबाबदार असल्याची टीका बीआरएसच्या नेत्या व आमदार के. कविता यांनी केली. शेतकऱ्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि काँग्रेस शेतकऱ्यांचा शत्रू आहे, हे सत्य जाणून घ्यावे, असे कविता यांनी सांगितले.
काय म्हणाले हाेते हरीश राव?
हरीश राव म्हणाले हाेते की, साेमवारी २७ नाेव्हेंबरला पैसे शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांचा चहा-नाष्टा हाेण्यापूर्वीच रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली असेल. याच वक्तव्याची आयाेगाने दाखल घेतली हाेती.