हैदराबाद - तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ६३.९४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या दोन वयोवृद्ध मतदारांचा मृत्यू झाला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या टोकला गंगाम्मा (७८) आणि राजन्ना (६५) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला. रांगेत उभ्या असलेल्या टोकला गंगाम्मा यांना हृदयविकाराचा झटका आला. दुसरीकडे रांगेत उभ्या असलेल्या राजण्णा यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. रुग्णालयात नेतताना ते दगावले. मतदानादरम्यान तीन ते चार ठिकाणी बीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली. काही ठिकाणी लाठीचार्जही झाला. तेलंगणातील १३ नक्षलग्रस्त प्रभावित विधानसभा जागांवर गुरुवारी दुपारी ४ वाजता मतदान शांततेत पार पडले. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सिद्दीपेट जिल्ह्यातील चिनरामाडाका गावात मतदान केले, तर एमआयएम प्रमुख असद्दुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये मतदान केले.
‘डीपफेक’वरून तक्रारबीआरएसने काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, पक्षाने बनावट मजकूर तयार करण्यासाठी ‘डीपफेक’ तंत्रज्ञानाचा वापरल्याचा आरोप केला.