Telangana Assembly Election: गुरुवारी(दि.7) तेलंगणामध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची तर, इतर 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांच्या शपथविधीनंतर दक्षिण भारतातील आणखी एका राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, रेवंत रेड्डी यांनी शपथविधी होण्यापूर्वीच जनतेला दिलेला शब्द पाळला.
रेवंत रेड्डी यांच्या शपथविधीपूर्वीच प्रगती भवन (मुख्यमंत्री निवास) जवळील बॅरिकेडींग बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आले. लोकांना सोप्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळावा आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी प्रगती भवनासमोर लावलेले लोखंडी बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. यामुळे रस्ताही मोकळा झाला आहे.
रेवंत रेड्डींनी वचन पाळलेनिवडणुकीपूर्वी रेवंत रेड्डी म्हणाले होते की, प्रगती भवन (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान)चे दरवाजे जनतेसाठी खुले असतील. तसेच, त्याचे नाव बदलून डॉ. बी.आर. आंबेडकर प्रजा भवन असे करण्यात येणार आहे. 2022 मध्ये आरटीआयद्वारे ही महिती उघड झाली. प्रगती भवन, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे.
केसीआर यांनी बांधले होते प्रगती भवनके. चंद्रशेखर राव यांनी 2016 मध्ये मुख्यमंत्री असताना शहराच्या मध्यभागी ही इमारत बांधली होती. ऑफिसर्स कॉलनीतील 10 आयएएस ऑफिसर्स क्वार्टर्स आणि 24 शिपाई क्वार्टर्स पाडून ही इमारत बांधण्यात आली. नऊ एकर जागेवर बांधलेल्या या संकुलाची किंमत 2016-2017 या आर्थिक वर्षात 45,91,00,000 रुपये होती. प्रगती भवनात पाच इमारती आहेत. त्यात निवासस्थान, मुख्यमंत्री कार्यालय, बैठक कक्ष, जुने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि कॅम्प ऑफिस आहे.
11 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथराज्यपाल तमिलीसाई सौंदर्यराजन यांनी रेवंत रेड्डींसह 11 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून भट्टी विक्रमार्क यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती.