गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) आगामी निवडणुकांसाठी बीआरएसच्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली.
या यादीत सात उमेदवारांचे नाव बदलण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री केसीआर हे गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. तर राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र केटीआर सिरिल्लामधून निवडणूक लढवणार आहेत. तेलंगणा विधानसभेसाठी ११९ जागा असलेल्या राज्यात सत्ताधारी बीआरएसने ११५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. केवळ गोशामहल, नामपल्ली, नरसापूर, जनगाव या जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
बीआरएसने आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, आमची AIMIM सोबतची मैत्री कायम राहील.आम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा १६ ऑक्टोबर रोजी वरंगलमध्ये प्रसिद्ध करू. पक्षविरोधी कारवायांमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. दरम्यान,मुख्यमंत्री केसीआर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ९५-१०५ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, तेलंगणाच्या ११९ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत.
'या' नेत्यांना मिळाली उमेदवारीबीआरएसने जाहीर केलेल्या या यादीत सिरपूर मतदारसंघातून कोनेरू कोनप्पा, चेन्नूरमधून (एससी) बाल्का सुमन, बेल्लमपल्लीमधून (एससी) मधून दुर्गम चिन्नैया, मंचेरीलमधून नदीपेल्ली दिवाकर राव, आसिफाबाद (एसटी) येथून कोवा लक्ष्मी यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच, खानापूरमधून (एसटी) भुक्या जॉन्सन राठोड नाईक, आदिलाबादमधून जोगू रामण्णा, बोथमधून(एसटी) अनिल जाधव, निर्मलमधून अल्लोला इंद्रकरण रेड्डी, माडहोलमधून गड्डीगारी विठ्ठल रेड्डी, बांसवाडामधून पोचाराम श्रीनिवास रेड्डी, बोधनमधून मोहम्मद शकील अमीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.