हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पत्रकार परिषदेत घेत अमित शाह यांनी राज्यातील मुख्यमंत्री के. चंद्रशेकर राव यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, तेलंगणातील लोकांचे एक मत या राज्याचे आणि देशाचे भविष्य ठरवेल, असे अमित शाह यांनी सांगितले.
बीआरएस सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले. दारू घोटाळा आपल्या सर्वांना माहित आहे. २०२० च्या पूर मदतीतही घोटाळा झाला होता. कोणत्याही सरकारची विश्वासार्हता त्याच्या आश्वासनांची पूर्तता केल्यानंतर ठरवली जाते. बीआरएस सरकारमध्ये पेपरफुटीमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही, असे सांगत अमित शाहांनी बीआरएस सरकारवर निशाणा साधला.
आम्ही केसीआर सरकारच्या पाठिंब्याशिवाय अनेक गरीब लोकांसाठी विकास कामे केली. जनसंघापासून ते आतापर्यंत भाजपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. जर तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते टीआरएस-बीआरएसकडे जातील. हे सर्व घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत. केसीआर हा 2 जी पक्ष आहे, ओवेसींचा पक्ष 3 जी पक्ष आहे, काँग्रेस 4 जी पक्ष आहे. येथे लोकशाही मूल्यांना स्थान नाही. निवडणुकीपूर्वी सगळे वेगळे होतात आणि निवडणुकीनंतर एकत्र येतात, असा शब्दांत हल्लाबोल अमित शाह यांनी केला.
बीआरएसने आपल्या जाहीरनाम्यात १ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, त्यांच्या सरकारमध्ये ८ पेक्षा जास्त पेपर लीक झाले, भरती होऊ शकली नाही. ४० लाख मुलांना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देणार होते, ते देऊ शकले नाहीत. ७ लाख गरीबांना घरे देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. मात्र, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. तसेच, बेरोजगारी भत्ता देऊ शकले नाहीत, अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्या पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले.
पुढे अमित शाह म्हणाले की, मी तेलंगणातील जनतेला योग्य पर्यायाने जाण्याचे आवाहन करतो. मला खात्री आहे की तेलंगणातील जागरूक मतदार प्रत्येक गोष्टीचे अचूक विश्लेषण करतील आणि मतदान करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी लक्षात ठेवतील. यानंतर त्यांची निवड निश्चितच 'कमळ' असेल, निश्चितच भाजप असेल. आम्ही सत्तेत आल्यास तेलंगणातील धर्मावर आधारित आरक्षणाची व्यवस्था संपुष्टात आणू. तसेच, आम्ही मुस्लिमांसाठी 4 टक्के आरक्षण काढून टाकू आणि त्याऐवजी मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ते सुनिश्चित करू, असेही अमित शाह यांनी सांगितले.
याचबरोबर, बीआरएसचा गेल्या १० वर्षांतील एकमेव उपक्रम म्हणजे भ्रष्टाचार! पासपोर्ट घोटाळा, दारू घोटाळा, मियापूर जमीन घोटाळा, कलेश्वरम प्रकल्प घोटाळा आणि बरेच काही…यादी संपत नाही. बीआरएसने राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही, हे तेलंगणातील जनतेला कळले आहे. तेलंगणातील लोक केसीआरच्या तुष्टीकरणाच्या धोरणाला कंटाळले असल्याने आम्ही व्यवस्था ठीक करू, असेही आश्वासन अमित शाह यांनी जनतेला दिले.