YSRTP विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या पार्टीला दिला बिनशर्त पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 05:29 PM2023-11-03T17:29:06+5:302023-11-03T17:43:54+5:30
शर्मिला यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
वायएसआर तेलंगणा पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. पार्टीच्या प्रमुख शर्मिला यांनी आज ही घोषणा केली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शर्मिला यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीची 'भ्रष्ट आणि लोकविरोधी राजवट' संपवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शर्मिला म्हणाल्या की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता असताना सरकारविरोधी मतांचे विभाजन करून अडसर बनायचे नाही. तसेच, काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला यांनी तेलंगणातील जनतेला माफ करण्याचे आवाहन केले आहे.
तेलंगणाच्या भवितव्यासाठी शर्मिला यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच, राज्यातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आल्याचे शर्मिला यांनी स्पष्ट केले. याशिवाय, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होणार आहे. तसेच, बदलत्या घडामोडींमुळे काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शर्मिला यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, वायएसआर तेलंगणा पार्टीने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे. शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पार्टीने कार्यकर्त्यांना तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.
राज्यात ३० नोव्हेंबरला होणार मतदान
तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.