हैदराबाद: महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीची चर्चा केवळ भारतात नाही, तर जगभरात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे बडे नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत मोठा धक्का दिला. यानंतर राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचला. याची परिणिती म्हणून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाले. याचे पडसाद अन्य राज्यातही उमटताना दिसत आहेत. यातच आता तेलंगणधील भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना सूचक इशारा देत, तुमच्या पक्षातही अनेक एकनाथ शिंदे असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना तेलंगणमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर घणाघाती टीका केली. केसीआर यांचे सरकार काहीच दिवसांचे असून, त्यांच्या पक्षात एक नाही, तर अनेक एकनाथ शिंदे आहेत, या शब्दांत कुमार यांनी केसीआर यांना थेट इशारा दिला. भाजपच्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीत काय घडले, याबाबत केसीआर यांना काय माहिती आहे का, अशी विचारणा करत, तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि भाजपकडे कोणतीच रणनीति नाही, असे तुम्ही कसे म्हणू शकता. भाजपकडे काहीच धोरण नसते, तर देशभरातील १८ राज्यांत सत्ता कशी झाली असती. मुख्यमंत्री केसीआर यांचे विधान लज्जास्पद असल्याचे टीकास्त्र कुमार यांनी सोडले.
पंतप्रधान मोदी आणि केसीआर यांच्यात खूप फरक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याच खूप फरक आहे. तुम्ही देशाचे नेते आहात का, अशी विचारणा करत, पंतप्रधान मोदी दिवसातील १८ तास काम करतात. मात्र, केसीआर आपल्या फार्महाऊसमधून बाहेरही पडत नाहीत, असा टोला कुमार यांनी यावेळी बोलताना लगावला. तसेच केसीआर यांनी स्वतःला देशाचे नेते म्हणणे हे हास्यास्पद आहे, असेही कुमार यांनी म्हटले आहे. भाजपप्रणित पंतप्रधान मोदी सरकार जाऊन देशात भाजपविरहीत सरकार यावे, अशी टिपण्णी मुख्यमंत्री केसीआर यांनी केली होती. यानंतर भाजपने जोरदार निशणा साधला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देत, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्या पक्षात डोकावून पाहा. तुमच्याच तेलंगण राष्ट्र समिती पक्षात अनेक एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी (केसीआर) एकनाथ शिंदे यांचा अनेकदा उल्लेख करण्यामागे हेच कारण असू शकते की, एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते आपल्याच पक्षात वाढत असल्याची भीती त्यांना वाटते, अशी टीका बंडी संजय कुमार यांनी केली.