हैदराबादः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रासह अनेक राज्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश येतानाही दिसते आहे. पण गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत कोरोना व्यक्तींच्या येत असलेल्या मृतदेहांनी सरकारची झोप उडवलेली होती. आता तेलंगणाच्या निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला अन् त्या रुग्णाचा मृतदेह अँब्युलन्सनं नव्हे, तर ऑटो रिक्षाच्या मदतीने अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे रुग्णालयानं त्या मृतदेहाचं शवविच्छेदन किंवा तपासणी वगैरे काहीही केलेलं नाही. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय व्यवस्थापनाने 50 वर्षांच्या कोरोना रुग्णाचा मृतदेह कोणत्याही रुग्णवाहिकेविना अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांकडे सोपविला. निजामाबाद सरकारी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेश्वर राव यांनी सांगितले की, मृतांचा नातेवाईक रुग्णालयात काम करतो. त्याच्या विनंतीवरून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या शवागारात काम करणा-या व्यक्तीच्या मदतीने मृतदेह ऑटोरिक्षात ठेवला. त्या ऑटोरिक्षातूनच तो मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आला. या घटनेनं तेलंगणात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही हा प्रकार वाऱ्यासारखा पसरला आहे.
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:36 AM