‘एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे योग्यच’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 01:13 PM2022-02-14T13:13:30+5:302022-02-14T13:13:40+5:30
Indian Air Strike: चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत.
हैदराबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड आत्मघातकी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या जवानांना आज आदरांजली वाहिली जात आहे. मात्र त्याचदिवशी पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राईकवरून राजकारणाला तोंड फुटले आहे. आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चंद्रशेखर राव यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींचे समर्थन केले आहे. एअरस्ट्राईकबाबत राहुल गांधींनी पुरावे मागणे हे काही चुकीचे नाही आहे. भाजपा नेहमी चुकीचा प्रचार करत असतो. मी विचारतो की सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये चुकीचे काय आहे. केंद्र सरकारपर्यंत माझं म्हणणं पोहोचवा, असे चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी केलेल्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांचे वक्तव्य हे बेजबाबदार असून, त्यांनी हुतात्मा जवानांचा अपमान केला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात चुकीचे काय आहे, असे म्हटले आहे. जर आमच्याकडे पुरावे आहेत, व्हिडीओ आहेत म्हणून सरकार सांगत असेल, तर ते दाखवण्यात काय चुकीचे आहे, असा प्रश्न राशिद अल्वी यांनी विचारला आहे.
१४ फेब्रुवारी २०१४ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर काश्मीरमध्येही व्यापक मोहीम हातात घेत दहशतवाद्यांचे काश्मिरमधील नेटवर्क उद्ध्वस्त केले होते.