तिरुपती : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरूमला येथील प्रसिद्ध वेंकटेश्वरला (बालाजी) पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने बुधवारी सकाळी अर्पण केले. राव यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय व मंत्रिमंडळातील काही सहकारी मंगळवारी रात्री येथे खास विमानाने १५ तासांच्या दौऱ्यावर आले होते. भगवान वेंकटेश्वरांचे दर्शन घेतल्यावर राव यांनी शंखशिंपल्यांनी जडित सोन्याचा हार ( शालिग्राम हारम) व अनेकपदरी सोन्याचा मखर कांताभरनम (नेकलेस) मंदिराचे कार्यकारी अधिकारी डी. सांभशिव राव यांच्याकडे सकाळी सुपूर्द केला, असे मंदिराच्या सूत्रांनी सांगितले. या हारांचे वजन १९ किलो व किमत पाच कोटी रुपये आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून एखाद्या राज्य सरकारने एवढे मोठे दान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.हे मंदिर दोन हजार वर्षे जुने असून जगातील श्रीमंत देवस्थान आहे. या कार्यक्रमानंतर मंदिरातील रंगनायक मंडपात राव यांना पवित्र रेशमी वस्त्र आणि प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी वैदिक मंत्र म्हणून त्यांना आशीर्वाद दिले. हैदराबादला रवाना होण्यापूर्वी राव यांनी येथून जवळ असलेल्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवस्थानी सुवर्ण दान केले.मी घेतलेल्या प्रतिज्ञा पूर्ण व्हाव्यात यासाठी मी भगवान वेंकटेश्वराकडे प्रार्थना करण्यास आणि दान देण्यास आलो होतो, असे चंद्रशेखर राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (वृत्तसंस्था)यापूर्वीही मुख्यमंत्री राव यांनी दोन मंदिरांना अशाच प्रकारे सोन्याचे दागिने दिले होते. तेव्हाही सरकारी तिजोरीतील पैसा अशा कारणास्तव वापरल्याबद्दल टीका झाली होती. च्स्वत:च्या प्रतिज्ञा वा नवस पूर्ण झाले, म्हणून सरकारी खर्चातून हे करणे चुकीचे आहे, असेच मत अनेकांनी व्यक्त केले होते.
तेलंगण मुख्यमंत्र्यांनी वाहिले ५ कोटींचे सोने
By admin | Published: February 23, 2017 1:39 AM