तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक तेलंगणातून लढण्याचे आवाहन रेवंत रेड्डी यांनी केले. तसेच, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने यापूर्वीच सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढवण्याचा ठराव मंजूर केला आहे, अशी माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली आहे.
आंध्र प्रदेशातून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे तेलंगणातील लोक सोनिया गांधींना आपली 'आई' मानतात आणि त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील कोणत्याही जागेवरून लढवावी अशी इच्छा आहे, असे रेवंत रेड्डी म्हणाले. दरम्यान, याबाबत सोनिया गांधी यांनी योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क, राज्याचे महसूल, माहिती आणि प्रसारण मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हेही उपस्थित होते.
या भेटीदरम्यान, रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची माहिती सुद्धा दिली. रेवंत रेड्डी म्हणाले, सहा आश्वासनांपैकी महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि आरोग्यश्री अंतर्गत आरोग्य कवच 5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढवणे, अशी दोन आश्वासने यापूर्वीच लागू करण्यात आली आहेत. तसेच, राज्य सरकार आता 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा आणि 500 रुपयांना गॅस सिलिंडर, ही दोन आश्वासने लागू करण्यास तयार आहे.
याचबरोबर, सरकारने मागास जातींची जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने तयारी वेगाने सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना सांगितले. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणा काँग्रेस राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत असून पक्षाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांकडून पक्षाकडे अर्ज येत आहेत. पक्षाचे नेतृत्व अर्जांची छाननी करेल आणि निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांची निवड करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधींना सांगितले.