हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव लवकरच महायज्ञ करणार आहेत. 100 एकर जागेत 1048 यज्ञ कुंड तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, 3000 हजारहून अधिक वैदिक पंडित आणि त्यांचे 3000 सहाय्यक हे महायज्ञ करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणामधील यदाद्री भुवनगरी जिल्ह्यात असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ या महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महायज्ञाला महा सुदर्शन यज्ञ असे नाव देण्यात आले आहे. या महायज्ञावेळी उपस्थित राहण्यासाठी जगभरातील साधू-संतांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी शमशाबाद आश्रमातील श्री टी. चिन्मा जीयर स्वामी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे लवकरच या महायज्ञाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
हा एकदिवसीय यज्ञ आहे. यासाठी लागणारी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या महायज्ञावेळी सर्व सामान्य जनता उपस्थित राहावी, यासाठी सरकार विचारधीन आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने याठिकाणी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आमच्याकडून काम सुरु आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.