Ram Mandir Ayodhya: २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा अवघे काही दिवस राहिले असताना, राजकीय वातावरण अधिकच तापत आहे. यातच तेलंगणचे नवे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर मत मांडताना भाजपावर टीका केली आहे. राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी धर्माचे राजकारण करत आहे, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली.
दावोस येथे एका मुलाखतीत बोलताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, तेलंगणातील भद्राचलम येथील राम मंदिरात अनेकदा गेलो आहे. मला अयोध्या आणि भद्राचलम राम मंदिरात फरक दिसत नाही. राम मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम झाल्यानंतर अयोध्येला जाईन, असे रेड्डी यांनी सांगितले. तसेच राम मंदिर हे सर्व हिंदूंचे आहे. याचा भाजपाशी काहीही संबंध नाही. मग त्यांना राजकीयदृष्ट्या कसा फायदा होईल, अशी विचारणा रेड्डी यांनी केली. राम मंदिराचा फायदा होईल, असा दावा भाजपावाले करत असतील, तर ते धार्मिक राजकारण करत आहेत, असे रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले.
हा पहिला किंवा शेवटचा दिवस नाही
राम मंदिराचे काम अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा केली जात असल्याबाबत शंकाचार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना रेड्डी म्हणाले की, चारही शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण असल्याने अयोध्येला जाणार नसल्याचे सांगितले होते. पण ज्याचा अशा गोष्टींवर विश्वास आहे तो जाऊ शकतो, हा पहिला दिवस किंवा शेवटचा दिवस नाही, असे रेड्डी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. यावर रेवंथ रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेची जनता आतुरतेने वाट पाहत होती. या उपक्रमामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवीन ऊर्जा निर्माण होईल. इंडिया आघाडी देशासाठी उत्तम काम करू शकते, असे सांगताना लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील १४ ते १७ जागा काँग्रेस जिंकू शकेल. निवडणुकीतील थेट लढत बीआरएस पक्षासोबत असेल, भाजपासोबत नाही, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे.