Telangana Crime :तेलंगणामध्य एका २८ वर्षीय महिला पोलीस हवालदाराची सोमवारी तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, महिला आणि तिच्या भावामध्ये मालमत्तेचा वाद होता आणि या बाजूनेही तपास केला जात आहे, असंही पोलिसांनी सांगितले.
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका भावाने आपल्या पोलीस हवालदार बहिणीची निर्घृणपणे हत्या केली. महिला हवालदाराने नुकतेच कुटुंबाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे भावाला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात त्याने बहिणीची हत्या केली. इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हयातनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदारा दुचाकीवरून ड्युटीसाठी जात असताना ही घटना घडली.
एस नागमणी या महिला हवालदाराने २१ नोव्हेंबर रोजी यादगिरीगुट्टा येथे दुसऱ्या जातीतील श्रीकांतशी विवाह केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागमणीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कडाडून विरोध होता आणि तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोमवारी परमेश याने नागमणीची हत्या केली.
"दोघांनी लग्न केल्यानंतर परमेश आणि कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्याचा विवाह स्वीकारण्याचे आणि जोडप्याला कोणताही त्रास देण्याचे आवाहन आणि समुपदेशन करण्यात आले होते. मात्र, पोलीस समजूत काढल्यानंतरही परमेशने धमक्या दिल्याचा आरोप श्रीकांतने केला होता. रविवारी नागमणी आणि श्रीकांत हे हैदराबादवरुन इब्राहिमपट्टणम येथे आले होते.
सोमवारी सकाळी श्रीकांत कामावर निघून गेला आणि नंतर त्याने नागमणीला कामावर गेलीस का नाही हे विचारण्यासाठी फोन केला. त्या फोन कॉल दरम्यान नागमणीने श्रीकांतला सांगितले की तिचा भाऊ तिच्यावर हल्ला करत आहे. त्यानंतर फोन कट झाला. नागमणी कामावर जाताना रायपोलजवळ आली तेव्हा परमेशने कारमधून तिचा पाठलाग केला आणि तिच्या स्कूटरला मागून धडक दिली, ज्यामुळे ती रस्त्यावर पडली. त्यानंतर परमेशने कुऱ्हाडीने तिची हत्या केली. श्रीकांत घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत नागमणीचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर काही मिनिटांत परमेश पोलिसांना शरण आला.
"नागमणी आणि तिच्या भावाचाही त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू होता. १५ दिवसांपूर्वी, नागमणीने रायपोलू गावातील श्रीकांतशी लग्न केले होते. ते हयातनगर येथून इब्राहिमपट्टणम येथे आले होते. सकाळी ती ड्युटीवर जात असताना एका भरधाव कारने तिच्या स्कूटरला मागून धडक दिली आणि चालकाने चाकूने तिची हत्या केली. संशय तिच्या भावावर असून हे प्रकरण कौटुंबिक असल्याचे समजते. तिच्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास सुरू केला जाईल,” असे इब्राहिमपट्टणम पोलिसांचे निरीक्षक बोलम सत्यनारायण यांनी सांगितले.