Telangana Election 2023: आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. यासाठी ते राज्यात विविध ठिकाणी जलद सभाही घेत आहेत. दरम्यान, रविवारी तेलंगणातील निर्मलमध्ये पीएम मोदींच्या रॅलीदरम्यान काही लोक खांबांवर चढले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना तातडीने खाली उतरण्याचे आवाहन केले.
नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होते, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी काही लोक खांबावर चढले. हे मोदींच्या लक्षात येताच त्यांनी, त्या लोकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. 'खाली या मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाला काही झाले तर मला खूप दुःख होईल. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही खाली या. गर्दी खूप झाली आहे, त्यामुळे तुम्ही मला पाहू शकणार नाहीत. मला भेटू न शकल्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो,' असं मोदी यावेळी म्हणाले
बीआरएसवर टीकायावेळी पीएम मोदींनी भारत राष्ट्र समितीवर टीका केली. 'तुम्ही मोदींना ओळखता, मी स्वतःचे घर बांधण्यासाठी नाही, तर गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी माझे घर सोडले आहे. आता बीआरएसने तंत्रज्ञानातही तुष्टीकरण सुरू केले आहे. भारतात धर्माच्या आधारे आयटी पार्क बांधले जाणार का?' असा सवाल त्यांनी यावेळी केला. सीएम केसीआर यांनी हैदराबादमध्ये मुस्लिम तरुणांसाठी आयटी पार्क बनवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावरुन मोदींनी ही टीका केली आहे.
यापूर्वीच्या सभेत मुलगी खांबावर चढलीतेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये 11 नोव्हेंबर रोजी आयोजित सभेत एक मुलगी चक्क वीजेच्या खांबावर चढून भाषण पाहात होती. मोदींना ते दिसताच त्यांनी आपले भाषण थांबवले आणि तातडीने त्या मुलीला खांबावरुन खाली उतरण्याचे आवाहन केले. 'तू खाली उतर, हे असे करणे योग्य नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत. याने कुणाचाच फायदा होणार नाही. मी तुझ्यासाठीच इथे आलोय, तुला काय बोलायचे आहे ते माझ्याशी बोल', असे मोदी त्या मुलीला म्हणाले होते.