Telangana Election 2023: येत्या 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. दरम्यान, भाजपने सोमवारी (27 नोव्हेंबर) हैदराबादचे नाव बदलून भाग्य नगर करण्याची मोठी घोषणा केली आहे.
तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी म्हणाले, “तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास हैदराबादचे नाव बदलले जाईल. मी विचारतो, हैदर कोण आहे? हैदर नावाची गरज आहे का? हैदर कुठून आला? हैदरची गरज कोणाला? भाजप सत्तेत आल्यास निश्चितपणे हैदर नाव काढून टाकले जाईल आणि शहराचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल." मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही यापूर्वी असेच म्हटले आहे.
रेड्डी पुढे म्हणतात की, "मद्रासचे नाव बदलून चेन्नई, बॉम्बेचे मुंबई, कलकत्ता ते कोलकाता आणि राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले आहे, तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्यात काय हरकत आहे? भाजप सत्तेवर आल्यास आम्ही त्या सर्व गोष्टी बदलू, ज्यातून गुलामगिरीची मानसिकता दिसून येते. भाजप नाव बदलण्याबाबत अभ्यासकांचे मतही घेणार आहे." विशेष म्हणजे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तेलंगणातील आपल्या निवडणूक रॅलींमध्ये हैदराबादचे भाग्यनगर आणि महबूबनगरचे नाव पलामुरु करण्याबाबत वक्तव्य केले आहे.