ज्या तेलंगणातील सत्तेच्या जिवावर केसीआर यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढविण्याची तयारी करत होता त्या तेलंगणात सत्तांतर होण्याचा अंदाज येत आहे. सीएनएनच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे.
तेलंगणातील सत्ता राखण्यासाठी केसीआरनी ९६ सभा घेतल्या होत्या. आज या राज्यातील ११९ जागांसाठी मतदान पार पडले. परंतू, सीएनएनने जारी केलेला एक्झिट पोल सत्ताधारी बीआरएससाठी काहीसा निराशजनक आहे. तेलंगणामध्ये ५६ जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहेत. तर बीआरएसला ४८ जागा मिळताना दिसत आहेत.
बीआरएस आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. तिथे भाजपा खरा खेळ करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पारड्यात १० जागा आणि एआयएमआयएमला ५ जागा मिळताना दिसत आहेत. एकंदरीत बीआरएसला सत्ता राखण्यासाठी झगडावे लागणार आहे.
जन की बातच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ४८-६४, बीआरएस ४०-५५ आणि भाजपा ७-१३ जागा मिळू शकतात.
टीव्ही ९ भारतवर्ष- पोलस्ट्रेट काँग्रेसला ४८-५८ जागा, बीआरएसला ४९-५९ जागा आणि भाजपाला ५-१० जागा व एमआयएमला ६-८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ६० जागांची आवश्यकता आहे.
केसीआर स्वत: दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही जागांवर जिंकले तर एक जागा त्यांना सोडावी लागणार आहे. याचाही फटका त्यांना सत्ता स्थापन करताना बसण्याची शक्यता आहे. काठावर जागा सुटल्या तर सत्तेचे गणित जुळविताना भाजपा आणि एमआयएमच्या आमदारांना कमालीचा भाव मिळणार आहे. अद्याप अन्य एजन्सींचे एक्झिट पोल येणे बाकी आहे.