दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली. तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन याही त्याच विमानात प्रवास करत होत्या. त्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याचे प्राण वाचवले. कृपानंद त्रिपाठी उजेला हे १९९४ च्या बॅचचे अधिकारी असून ते डेंग्यूनं ग्रस्त झाल्यानंतर आता हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
“गव्हर्नर मॅडमनं माझे प्राण वाचवले. त्यांनी आईप्रमाणे माझी मदत केली. अन्यथा मी रुग्णालयात पोहोचू शकलो नसतो,” अशी प्रतिक्रिया उजेला यांनी शनिवारी पीटीआयशी बोलताना दिली. आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी उजेला यांची सध्या अतिरिक्त डीजीपी (रस्ते सुरक्षा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.