महबूबाबाद: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या भगिनी आणि YSRTP प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. तेलंगण हे भारताचे अफगाणिस्तान आहे आणि केसीआर हे त्याचे तालिबान असल्याचे शर्मिला यांनी म्हटले. त्या रविवारी महबूबाबादमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी शर्मिला म्हणाल्या, "ते (तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर) हुकूमशहा आहेत, ते निर्दयी/अत्याचारी आहेत. तेलंगणात भारतीय संविधान नाही, फक्त केसीआरचे संविधान चालते. तेलंगण हे भारताचे अफगाणिस्तान आहे आणि केसीआर हे त्याचे तालिबान आहेत.'' उल्लेखनीय म्हणजे, महबूबाबादचे आमदार आणि बीआरएस नेते शंकर नाईक यांच्याविरोधात अनुचित टिप्पणी केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी वायएस शर्मिला यांना रविवारी ताब्यात घेतले आहे.
महबूबाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना हैदराबादला नेले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि एससी/एसटी पीओए कायद्याच्या कलम 3 (1) आर अंतर्गत शर्मिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.