हैदराबाद - तेलंगणातमंत्री महोदयांच्या ताफ्यातील कारने एका आयपीएस अधिकाऱ्यालाच धडक दिल्याची घटना घडली आहे. येथील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातून मंत्री श्रीधर बाबू यांचा ताफा जात असताना, ताफ्यातील एका कारने IPS अधिकारी परितोष पंकज यांनाच धडक दिली. या दुर्घटनेत IPS अधिकारी परितोष पंकज गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या कार्यक्रमापूर्वी आढावा घेण्यासाठी व जागेची पाहणी करण्यासाठी मंत्री श्रीधर बाबू गेले असता ही अपघाताची घटना घडली.
मंत्री श्रीधर बाबूंचा ताफा भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातून जात असताना ही अपघाताची घटना घडली. आयपीएस अधिकाऱ्याला ताफ्यातील कारने धडक दिली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यानुसार, एक पोलीस अधिकारी मंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सूचना देत असल्याचे दिसून येते. यादरम्यान, नजरचुकीने ते अधिकारी मंत्री महोदयांच्या ताफ्यातील कारसमोर येतात. त्यामुळे, ताफ्यातील कारची त्यांना धडक बसते. या दुर्घटनेत एसीपी महोदयांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे, त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथून हैरदाबाद येथे हलविण्यात आल्याचे समजते.
मंत्री महोदयांच्या दौऱ्यात आपलं कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासोबत ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या घटनेनंतर तत्काळ इतर पोलीस सहकारी व अधिकाऱ्यांना एसीपी अधिकाऱ्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.