नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार, तेलंगणामध्ये झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधीचं नुकसान देखील झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
जोरदार पावसाचा सर्वांनाच बसला असून अनेकांची घरं कोसळली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. याच दरम्यान पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. संतापलेल्या लोकांनी या आमदाराला चपला फेकून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून यामध्ये लोक चपला फेकून मारताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी ( Manchireddy Kishan Reddy) आणि टीआरएसचे कार्यकर्ते पुराचा फटका बसलेल्या मेडिपल्ली येथे पहाणी करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील स्थानिकांनी पुरामुळे झालेले नुकसानांमुळे संतापाच्या भरात आमदार आणि त्याच्या समर्थकांना चपला फेकून मारल्या. गुरुवारी ही घटना घडली. तसेच आमदाराच्या गाडीची देखील तोडफोडही केली.
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे घडलेल्या वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) क्षेत्रामध्ये मृतांचा आकडा 11 पर्यंत गेला आहे. पावसामुळे जवळजवळ पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.