या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसर मोदींनी निशाणा साधला आहे. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक अदानी-अंबानींचं नाव घेणं कसं काय बंद केलंत? त्यांच्याकडून किती माल उचललात? असा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन काँग्रेसला विचारला.
तेलंगाणामधील करीमनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षांमध्ये सकाळी उठल्यापासून काँग्रेसचे राजकुमार एक जपमाळ ओढायला सुरुवात करायचे हे तुम्ही पाहिलंच असेल. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण जमिनीवर आलं. तेव्हापासून त्यांनी एक नव्या माळेचा जप सुरू केला. पाच वर्षांपासून ते एकाच माळेचा जप करत होते. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. मग हळुहळू अंबानी- अदानी, अंबानी-अदानी म्हणायला लागले. मात्र जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून यांनी अंबानी-अदानीवरून शिव्या देणं बंद केलं.
आता काँग्रेसच्या युवराजांनी या निवडणुकीत अंबानी आणि अदानींकडून किती माल उचलला, हे जाहीर करावं. काळ्या पैशांच्या गोण्या भरून रुपये आणले आहेत. की टेम्पोमध्ये भरून नोटा कांग्रेससाठी पोहोचल्या आहेत. नेमका काय सौदा झाला आहे ज्यामुळे तुम्ही रातोरात अंबानी आणि अदानींना शिव्या देणं बंद केलंय. पाच वर्षांपर्यंत शिव्या दिल्या आणि रातोरात बंद केल्या. नक्कीच डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. काही तरी चोरीचा माल टेंम्पोमध्ये भरून तुम्हाला मिळालाय. याचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिला.
या सभेमधून मोदींनी बीआरएसलाही टीकेचं लक्ष्य केलं. मोदी म्हणाले की, तेलंगाणाच्या स्थापनेवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. मात्र बीआरएसने जनतेच्या स्वप्नांचा भंग केला आङे. काँग्रेसचाही असाच इतिहास राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर काँग्रेसनेही हेच केलं. देश बुडाला तर बुडाला, यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही. फॅमिली फर्स्ट धोरणामुळे काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या कार्यालयातही प्रवेश दिला गेला नाही. अखेर भाजपाने पी. व्ही. नरसिंह राव यांना भारत रत्न देऊन सन्मानित केले, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला.