नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,06,10,883 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,223 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 151 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,52,869 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून लाखो लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र लसीकरणानंतर साईड इफेक्टच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यात कोरोना लस घेतल्यानंतर एका 42 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर काही वेळाने कर्मचाऱ्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मात्र आरोग्य विभागानं कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा कोरोना लसीकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचाऱ्याला मंगळवारी सकाळी 11.30 वाजता जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस देण्यात आली होती. बुधवारी पहाटेच 2.30 वाजता त्यांना छातीत दुखत असल्याचं जाणवलं. सकाळी जवळपास 5.30 वाजल्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी दिली आहे.
"आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा कोरोना लसीकरणाशी काहीही संबंध नाही"
प्राथमिक माहितीनुसार, आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा कोरोना लसीकरणाशी काहीही संबंध नाही. गाईडलाईन्सनुसार, डॉक्टरांच्या टीमकडून मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर एका वॉर्ड बॉयचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर प्रशासनाने याबाबत माहिती दिली होती. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरात 16 जानेवारीपासून सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र आता या लसीचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्ट) बर्याच लोकांमध्ये दिसून आले आहेत.
"माझी आता इच्छा नाही, मी लस टोचून घेणार नाही"; डॉक्टर अन् नर्सचा हाय व्होल्टेज ड्रामा
जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आजपासून शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. मात्र याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. "माझी आता इच्छा नाही, मी लस टोचून घेणार नाही" असं म्हणत कोरोनाच्या लसीकरणाला थेट नकार देण्यात आला आहे. डॉक्टर अन् नर्सचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात येथील भोगनीपूर तहसील क्षेत्राअंतर्गत पुखराया सीएससीमध्ये ही घटना घडली आहे. महिला स्टाफ नर्स गीताने सीएससी परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू केला होता. यानंतर सीएससीमध्ये तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरने कोरोनाची लस घेण्यास नकार दिला. आता माझी इच्छा नाही म्हणून मी कोरोना लस टोचून घेण्यास नकार दिला असं डॉक्टर प्रियंकाने म्हटलं आहे.