नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांनी कपात करण्यात आली आहे. परंतु तरीही गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. हे दरही रुपयांत नव्हे, तर पैशांत कमी होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणातल्या एका व्यक्तीनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पैशांची कपात होत असल्यानं वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट 9 पैशांचा धनादेश दान स्वरूपात पाठवून दिला आहे. सिरसिला जिल्ह्यातील के. व्ही. चंद्रय्या यांनी प्रजा वाणी यांच्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा कलेक्टर यांच्या हाती हा धनादेश सोपवला आहे.चंद्रय्या म्हणाले, तुम्ही तेलाच्या किमतीत 9 पैशांची कपात केली आहे. तेलाचे दर कमी झाल्यामुळे मी त्यातील पैसे वाचवले. आता याच पैशांना मी पंतप्रधानांना दान करू इच्छितो. आशा आहे की, या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होईल. आज पेट्रोलच्या दरात 13 पैसे तर डिझेलच्या दरात 9 पैशांनी कपात करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेट्रोलचे दर पैशांत कमी केले जात असल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. कर्नाटक निवडणुकीदरम्यान जवळपास 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दर जशास तसे ठेवण्यात आले होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या सूत्राचं पुनरावलोकन केलं असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे कायमचे दर कमी करण्यासाठी सूत्र ठरवू, असेही त्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा आंध्र प्रदेशातल्या रायलसीमा भागातील एका शेतक-यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या दिवशी 0.68 पैशांचा धनादेश पाठवला होता.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानं वैतागलेल्या तरुणानं मोदींना पाठवला 9 पैशांचा धनादेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 5:23 PM