नवी दिल्ली - तेलंगणाचे (Telangana) आयटी मंत्री आणि टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर राव (KTR Rao) यांनी विधानसभेत एक वादग्रस्त विधान केलं आहे. हैदराबादच्या नाला विकास प्रकल्पावर उत्तर देताना केटीआर राव यांनी हे विधान केलं आहे. लष्करी छावणीच्या (Cantt Area) अंतर्गत आम्ही गरज पडेल तेव्हा वीज आणि पाणी कापू. लष्कराकडून मनाला वाटेल तेव्हा रस्ता बंद केला जातो. हे योग्य नाही. त्यामुळे आम्हीही त्यांचं वीज, पाणी कापू शकतो, असं केटीआर राव यांनी म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाजपाने यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केटीआर राव यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. केटीआर हे सुशिक्षित व्यक्ती आहेत. तरीही त्यांनी असं विधान करावं हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. त्यांच्या मनात लष्कराविषयीचा सन्मान नाही हेच दिसून येतं, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते एनव्ही सुभाष यांनी केली आहे. लष्कराबाबतची सरकारची काय मते आहेत, हेच या विधानातून दिसून येत असल्याचंही सुभाष यांनी सांगितलं.
सरकारचं कोणी ऐकत नाही तेव्हा ते धमकी द्यायला सुरुवात करतात. लोकांचं काम न करणाऱ्या या सरकारला जनता लवकरच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. तेलंगणा सरकारमध्ये काही समस्या असतील तर त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. तसेच समस्येतून मार्ग काढला पाहिजे, असं भाजपा प्रवक्ते सुभाष यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची प्रकृती बरी नाही. त्यांनी काल वैद्यकीय चाचणी करून घेतली. चंद्रशेखर राव यांची प्रकृती चांगली असून घाबरण्याचं काही कारण नाही, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान तपासणी केल्यानंतर चंद्रशेखर राव हे घरी निघून गेले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.