Revanth Reddy CM Face: नुकत्याच पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात सत्ता काबीज केली. या विजयात महत्वाची भूमिका बजवणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. शपथविधीची पूर्ण तयारी करण्यात आली असून येत्या 7 डिसेंबर रोजी रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपत घेतील. इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होईल.
न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत रेवंत रेड्डींच्या नावे एकमत झाले, आता अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोडण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
रेवंत रेड्डींना पक्षातून विरोधदरम्यान, रेवंत रेड्डी यांना पक्षातील काही नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा रेवंत रेड्डींना विरोध आहे. भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डींच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
तेलंगणात काँग्रेसची कामगिरीतेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तसेच, बीआरएसने 39, भाजपने 8 आणि एमआयएमने 7 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.