हैदराबाद: तेलंगण मंत्रिमंडळाच्या रविवारी येथे झालेल्या बैठकीत राज्य विधानसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा अपेक्षित निर्णय झाला नाही. मात्र सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलाने व मुलीनेही मुदतपूर्व निवडणुकीवर सक्रियतेने विचार सुरु असल्याचे स्पष्ट संकेत दिले.राज्याचे आयटी मंत्री व मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव के. टी. रामाराव म्हणाले की, पुन्हा जनतेकडे जाऊन नव्याने कौल घेण्याची हिच योग्य वेळ आहे, असे पक्षाला वाटते. मुदतपूर्व निवडणूक झाल्यास पक्ष पूर्वीपेक्षा अधिक जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढेच नव्हे तर विधानसभा निवडणूक आधी झाल्यास नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची गणिते अधिक स्पष्टपणे मांडता येतील, असे ते म्हणाले.पक्ष निवडणुकीस सामोरे जायला केव्हाही तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कन्या व खासदार के. कविता म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा व काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची संघीय आघाडी करण्यासाठी पक्षाध्यक्ष केसीआर नेटाने प्रयत्न करीत अहेत, असेही त्यांनी सांगितले.पक्षाला निवडणूक ‘मोड’मध्ये आणण्यास ‘टीआरएस’ची एक प्रचंड सभाही रविवारी झाली. राज्यभरातून आलेले लाखो पक्ष कार्यकर्ते सभेला उपस्थित होते. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सरकारचा कार्य अहवाल सभेत सादर केला. (वृत्तसंस्था)
तेलंगणमध्ये मुदतपूर्व निवडणूक? ‘टीआरएस’ची एक प्रचंड सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:42 AM