तेलंगणात विरोधकांना कौटुंबिक टीका-टिप्पणी नडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:10 AM2018-12-12T04:10:09+5:302018-12-12T04:15:12+5:30
केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.
- धनाजी कांबळे
तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा मुद्दा भावनिक होता. टीडीपी काँग्रेससोबत गेल्याने येथील जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांची मते वळविण्यात केसीआर यशस्वी ठरले आहेत. विरोधकांनी पातळी सोडून टीका-टिप्पणी केल्याने त्याचा काँग्रेस आघाडीला नुकसानच झाल्याचे दिसत आहे.
शेतकरी कर्जमाफी, दलित-आदिवासींना ३ एकर जमीन, रोजगार, मुस्लिमांना १२ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, दोन खोल्यांची घरे, पेन्शन असे प्रश्न प्रामुख्याने विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले; केसीआर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. कौैटुंबिक टीका-टिप्पणीमुळे विरोधकांना मिळालेली सहानुभूती कमी झाल्यामुळेच टीआरएसला निर्विवाद वर्चस्व राखता आले आहे.
भाजपाने मात्र हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करून मुस्लिमांचे लाड करून घेतले जाणार नाहीत, तसेच १२ टक्के आरक्षण देणे शक्यच नाही, कोणी देण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊ देणार नाही, अशा पद्धतीने अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी भडकावू भाषणे केली.
नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहन केले; मात्र तेलंगणात केवळ २ जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागले आहे. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर सोनिया गांधी प्रथमच येथे आल्या होत्या. त्यांच्या सभेचा परिणाम होईल, असे वाटले होते. मात्र, स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक झाल्याने काँग्रेसला देखील टीडीपीला सोबत घेऊनही मतदारांनी नाकारले आहे. टीडीपीचा तेलंगणातील वाढता हस्तक्षेप धोकादायक असून, आंध्रातील लोक आमच्यावर राज्य करतील, त्यांना वेळीच रोखा, असे आवाहन केसीआर यांनी सभांमधून केले आहे. त्यामुळे अस्मितेचा मुद्दाही येथे महत्त्वाचा ठरला आहे.
एमआयएमने ८ जागा लढविल्या. त्यात त्यांना आता ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी सुरुवातीलाच टीआरएसला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे हैैदराबादमधील एमआयएमचे उमेदवार विजयी होतील, असेच अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त झाले होते.
या कारणांमुळे झाला टीआरएसचा विजय
तेलंगणाच्या जनतेवर आंध्रातील लोक राज्य करतील, हा भावनिक मुद्दा
चित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.
काँग्रेसने टीडीपीला सोबत घेतल्याने काँग्रेसबद्दलची सहानुभूती कमी होऊन टीआरएसकडे कल वाढला.
विकासकामे आणि राबविलेल्या योजनांमुळे लोकमत आपल्या बाजूला वळविण्यात केसीआर यांना यश आले. विरोधकांमधील बेकीमुळेही टीआरएसला मदत झाली.