उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. अमेरिकेतील या वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे. यावरून विरोधक केंद्र सरकारची कोंडी करत आहेत. तसेच, शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली.
दरम्यान, गौतम अदानी यांनी तेलंगणा सरकारला १०० कोटी रुपयांची देणगी दिल्याचे भाजपने अलीकडेच म्हटले होते. यावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी अनेक कंपन्यांनी निधी दिला होता. यामध्ये अदानी समूहानेही १०० कोटी रुपयांची देणगी दिली होती. मात्र, अदानी यांनी दिलेले १०० कोटी रुपये स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच अदानी समूहाचे १०० कोटी रुपये परत केले जातील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील आपल्या कंपनीसाठी सौरऊर्जेशी संबंधित प्रकल्प आणि कंत्राट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना २१०० कोटी रुपयांची लाच दिली होती. ही गोष्ट त्यांनी त्या अमेरिकन बँकांच्या गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा आरोपही आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे मान्य केले होते, असा दावा अमेरिकन वकिलांनी केला आहे.
या प्रकरणी अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांच्यासह सात जणांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. गौतम अदानी व्यतिरिक्त अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) बुधवारी त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत जैन तसेच अझूर पॉवरचे सीईओ रणजीत गुप्ता आणि कंपनी सल्लागार रुपेश अग्रवाल यांच्यासह सात जणांचा या प्रकरणात समावेश आहे. मात्र, यााप्रकरणी गौतम अदानी यांच्याबद्दल एसईसी थेट बोलावू शकत नाही. त्यासाठी एसईसीला राजनयिक माध्यमातून नोटीस द्यावी लागेल. एसईसीला परदेशी नागरिकांना थेट बोलावण्याचा अधिकार नाही.
दरम्यान, अमेरिकेतील वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे. भारतात देखील यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. हे लाच प्रकरणावर वाद निर्माण झाल्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या प्रकारामुळे कंपनीने अमेरकेतील एक गुंतवणुकीचा मोठा करार देखील रद्द केला आहे.
अदानी समूहाचे स्पष्टीकरण काय? अदानी ग्रीन संचालकानविरुद्ध अमेरिकेच्या कोर्टाने आणि अमेरिकन सिक्युरिटीज व एक्स्चेंज कमिशनने गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप निराधार असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. फिर्यादी पक्षाने आरोप लावले असले तरी देखील ते केवळ आरोप आहेत. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोवर प्रतिवादी निर्दोष असतो, अशी स्पष्ट बाजू अदानी समूहाने निवेदन जारी मांडली आहे. या प्रकारे कायदेशीर लढाई लढण्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.