हैदराबाद: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. हजारो कुटुंबे कोरोनामुळे त्रस्त झाली आहेत. अनेकांची घरे लहान असल्याने विलगीकरणासाठी केंद्रावर जावे लागत आहे. मात्र, तेलंगणमधील नालगोंडा जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला विलगीकरण सुविधा नसल्याने एका झाडावर ११ दिवस काढावे लागल्याचे सांगितले जात आहे. (telangana student spent 11 days of isolation on tree due to corona)
देशातील लाखो कुटुंबांची घरे लहान असल्याने कोरोना रुग्णांना घरात विलगीकरणात राहणे शक्य होत नाही. तेलंगणमधील नालगोंडा जिल्ह्यात कोरोनाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फटका एका १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बसल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, अन्यत्र विलगीकरणाची सोय नसल्यामुळे त्याला तब्बल ११ दिवस झाडावर बसून काढावे लागल्याचे सांगितले जात आहे. कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे.
योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा
झाडावर कोव्हिड वॉर्ड
या मुलाचे नाव शिवा आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या गावातील डॉक्टरांनी इतर कोठेही जागा नसल्याने त्याला गृहविलगीकरणात राहावयास सांगितले. तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती सरपंचानाही होती. त्यांनी शिवाला मदत केली नाही. शिवा पॉझिटिव्ह असल्याने आजूबाजूचे घराबाहेर पाऊल काढायलाही घाबरत होते. अशा परिस्थितीत शिवाला एक कल्पना सुचली. त्याने बांबूच्या काड्यांचा बिछाना तयार केला. तो झाडावर ठेवला. अशा प्रकारे त्याने ११ दिवस काढले. प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
चीनकडून काही अपेक्षा नाही! नेपाळमध्ये ऑक्सिजन तुटवडा; भारताला मदतीचे साकडे
गावातून कोणीही मदतीसाठी आले नाही
आमच्या गावात विलगीकरण केंद्र नाही. माझ्या कुटुंबात चार जण राहतात. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील काही जणांना सरपंचांना याबाबत सांगितले. मात्र, ते मदतीसाठी पुढे आले नाहीत. तसेच गावातून अन्य कुणीही मदतीला आले नाही. सर्वजण कोरोनाला घाबरून घराबाहेरच पडत नाहीत, असे शिवाने सांगितले. एक बादली दोरीला बांधून त्यातून अन्नपदार्थ आणि अन्य गरजेच्या गोष्टी घेतल्याचे शिवाने सांगितले.
दरम्यान, कोठानंदीकोंडा गावात ३५० कुटुंबे राहतात. आदिवासी गावांपैकी हे एक गाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ५ किमी अंतरावर असून, आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात दाखल व्हायचे असेल, तर ३० किमी लांब जावे लागते, असे सांगितले जाते.