Telangana: तेलंगाणा सरकारचा मोठा निर्णय, युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:13 PM2022-03-15T17:13:57+5:302022-03-15T17:14:07+5:30
केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले.
हैदराबाद: रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. दरम्यान, परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना तेलंगाणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
युक्रेनमधून परतलेल्या आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तेलंगाणा सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगाणा सरकारचे मंत्री केटी रामाराव (KTR) यांनी ही घोषणा केली आहे. KTR हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचे पुत्र आणि सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) चे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.
केटीआर याआधीही युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सक्रियपणे बोलत आहेत. विशेष विमानाची व्यवस्था करुन युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारला विनंती केली होती. यामध्ये तेलंगणा सरकार विशेष विमानांवरील खर्च उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, केंद्र सरकारने खास 'ऑपरेशन गंगा' चालवून सर्व 18,000 भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले आहे.
दरम्यान, युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील 50% जागांवर सरकारी वैद्यकीय-शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने फी आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे विद्यार्थी युक्रेनमधून इंटर्नशिप अपूर्ण ठेवून परतले आहेत, ते काही निकष पूर्ण केल्यानंतर भारतात पूर्ण करू शकतील, असेही सांगण्यात आले आहे.