हैदराबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र, हा उमेदवार मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रमुखी असे या उमेदवाराचे नाव आहे. चंद्रमुखी या बहुजन डाव्या आघाडीच्या उमेदवार आहेत. त्या हैदराबादमधील गोशमहल मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मुकेश गौड यांचे तगडे आव्हान आहे. याचबरोबर, भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेम सिंह राठोड याच मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, मंगळवारपासून चंद्रमुखी त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रमुखी यांचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, येत्या 7 डिसेंबरला तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.