हैदराबाद - ‘लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण सरकारी यंत्रणेने भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या आदर्शांना साकार करण्यासाठी काम करावे, या उद्देशाने तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी येथे रविवारी सांगितले. २६५ फूट उंच आणि २८ एकर जागेत १०,५१,६७६ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन सचिवालय संकुलाचे उद्घाटन राव यांनी केले.
तेलंगणा आंदोलनादरम्यान आलेल्या अनेक अडचणींचा तसेच नवे सचिवालय बांधताना झालेल्या विरोधाचा उल्लेखही मुख्यमंत्री राव यांनी यावेळी केला. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून राज्य सचिवालय बांधले आणि ते देशातील सर्वोत्कृष्ट सचिवालयांपैकी एक असल्याचेही राव म्हणाले.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच तेलंगणा सरकारने प्रत्येक क्षेत्रात तेलंगणाची पुनर्बांधणी सुरू केली. तेलंगणा राज्य हे देशासाठी आदर्श आणि मार्गदर्शक शक्ती बनले आहे. राज्यातील सर्व जलसाठे पुनरुज्जीवित झाले असून भर उन्हाळ्यातही तलाव पाण्याने भरलेले आहेत. याला म्हणतात राज्याची पुनर्रचना आणि सर्व राजकीय विरोधकांनी डोळे उघडून राज्यातील हा विकास पहावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज तेलंगणात जगातील सर्वात मोठा कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प बांधला आहे, जो अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे. धरणांमुळे जलस्रोत पुनर्संचयित करण्यास मदत झाली आहे. देशातील ८४ लाख एकर भातशेतीपैकी एकट्या तेलंगणात ५६ लाख एकर क्षेत्रात लागवड झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
तेलंगणात २४ तास वीजआज तेलंगणात विजेचे संकट नाही. चोवीस तास सर्व क्षेत्रांना पुरवठा केला जातो. शेतकरी स्वाभिमानाने जगत आहेत आणि हा तेलंगणाच्या पुनर्रचनेचा परिणाम आहे. गावे आणि शहरांची वाढ अभूतपूर्व आहे. तेलंगणाने केंद्र शासनातर्फे दिले जाणारे विक्रमी पंचायत पुरस्कार पटकावले आहेत, असे राव म्हणाले.