राज्यसभा टीव्हीवर विरोधकांची भाषणे कापून मोदी आणि शहांना प्राईम टाईम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 08:44 AM2018-02-08T08:44:06+5:302018-02-08T08:44:24+5:30
राज्यसभा टीव्हीवर विरोधकांच्या तुलनेत अमित शहा यांची भाषणेच जास्तवेळा दाखवली जातात.
नवी दिल्ली: राज्यसभेतील कामकाज आणि संसदेतील घडामोडींचे वार्तांकन करणारी राज्यसभा टीव्ही ही वृत्तवाहिनी भाजपाच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या लोकसभेतील भाषणाचा काही अंश जाणूनबुजून कापण्यात आल्याचे गुलाम नबी आझाद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. राज्यसभा टीव्हीचे अशाप्रकारे भाजपा टीव्हीत रुपांतर करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
डेरेक ओब्रायन यांनी लोकसभेत नुकतेच एक भाषण केले होते. त्यावेळी पहिली चार मिनिटे त्यांचे भाषण राज्यसभा टीव्हीवर प्रसारित करण्यात आले नव्हते. योगायोग म्हणजे याचवेळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. याशिवाय, विरोधकांच्या दाव्यानुसार राज्यसभा टीव्हीवर विरोधकांच्या तुलनेत अमित शहा यांची भाषणेच जास्तवेळा दाखवली जातात. विरोधी नेत्यांना आणि अन्य वार्तांकनाला अगदी थोडावेळच दिला जातो. उरलेला 98 टक्के वेळ अमित शहा यांच्यासाठीच खर्ची घातला जातो, असा आरोप विरोधकांनी केला.
या प्रकाराबद्दल राज्यसभा टीव्हीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. डेरेक ओब्रायन यांचे भाषण सुरू असताना आमच्या मुख्य कार्यालयातील वीज काही वेळासाठी गेली होती. मात्र, हा बिघाड तातडीने दुरुस्त करून अवघ्या चार मिनिटांत त्यांच्या भाषणाचे प्रसारण पुन्हा सुरु करण्यात आले, असे राज्यसभा टीव्हीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, हा प्रकार म्हणजे आणीबाणी असल्याची टीका डेरेक ओब्रायन यांनी केली.
तर गुलाम नबी आझाद यांनीही भाजपा राज्यसभा टीव्ही पक्षाच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचे म्हटले. भाजपाने इतर वृत्तवाहिन्यांना आपल्या दावणीला बांधले आहे. मात्र, राज्यसभा टीव्हीच्या बाबतीत तसे करू नका. या सगळ्याची सर्वपक्षीय समितीकडून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या संपूर्ण नियंत्रणाखाली राज्यसभा टीव्ही चालतो. यापूर्वी उपराष्ट्रपतीपद काँग्रेसच्या हमीद अन्सारी यांच्याकडे असल्यामुळे केंद्रात भाजपाची सत्ता असूनही राज्यसभा टीव्हीचा कारभार स्वायत्तपणे सुरू होता. राज्यसभा टीव्हीने अनेकदा सरकारविरोधी भूमिकाही घेतली आहे. यावरून भाजपा नेत्यांमध्ये तीव्र नाराजी होती.