नवी दिल्ली : शेतात पीक कापणीनंतर राहिलेल्या खुंटांची आग नियंत्रणात ठेवण्यास पावले न उचलल्याबद्दल राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) दिल्ली आणि त्याच्या शेजारच्या इतर राज्यांना मंगळवारी झटकले. या आगीमुळे निर्माण होणारे हवेचे प्रदूषण कसे नियंत्रणात आणणार याबद्दल आमच्या मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी कशी करणार याचा संपूर्ण माहिती उद्यापर्यंत (९ नोव्हेंबर) द्या, असे आदेश दिले.एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठाने पिकांचे खुंट जाळणे व हवेचे प्रदूषण याबाबत आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दिल्ली, हरियाना, राजस्थान, पंजाब व उत्तर प्रदेशच्या सचिवांची चांगलीच खरडपट्टी काढली. हे धुरके वाढत असताना व हवेत प्रदूषित कण मर्यादेबाहेर वाढत असताना तुम्ही काय करीत होता, तुम्ही काय उपाययोजना केली, असे प्रश्न स्वतंत्र कुमार यांनी विचारले.सुरुवातीचे पाच दिवस राज्य आणि केंद्राने काहीही केलेले नाही. सामान्य माणसाला अनुभवास येईल अशी एक तरी बाब आम्हाला दाखवा, असेही ते म्हणाले. धुळीला खाली बसविण्यासाठी दिल्ली सरकारने हेलिकॉप्टरमधून पाणी न टाकता यारीचा वापर केल्याबद्दल लवादाने टीका केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काय केले ते सांगा : एनजीटी
By admin | Published: November 09, 2016 6:22 AM